कोल्हापूर : उद्योग-व्यवसायातील दैनंदिन धावपळ, वाढत्या जबाबदाऱ्या आणि कामाचा ताण यामधून उद्योजकांनी तणावमुक्त राहून आनंदाने उद्योग करावा, तसेच सकारात्मक ऊर्जा, मानसिक शांतता आणि एकाग्रता वाढवावी, या उद्देशाने कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनतर्फे Team SJ’s Fueling Destinies यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आजपासून टेन्शन फ्री!’ या विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास २५ उद्योजक सभासदांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
अध्यक्ष कमलाकांत कुलकर्णी यांनी स्वागतपर प्रास्ताविक केले म्हणाले कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या वतीने उद्योजकांच्या व्यावसायिक विकासासोबतच त्यांच्या मानसिक स्वास्थ्य, सकारात्मक दृष्टिकोन आणि जीवनातील आनंदासाठी अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. त्यांच्याहस्ते गुरूश्री शंतनु जोशी यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.
या प्रशिक्षण कार्यक्रमात गुरूश्री शंतनु जोशी (Life Purpose Architect) यांनी उद्योजकांना अत्यंत प्रभावी व ऊर्जादायी मार्गदर्शन केले. उद्योगातील दैनंदिन कामकाज अधिक आनंददायी कसे करता येईल, तणावमुक्त राहून उद्योग कसा करावा, तसेच व्यावसायिक आव्हानांकडे सकारात्मक दृष्टिकोनातून कसे पाहावे, याबाबत त्यांनी विविध उदाहरणे व अनुभवांच्या माध्यमातून मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात Energy Talk तसेच ध्यान (Meditation) सत्र घेण्यात आले. ध्यानाच्या माध्यमातून मनःशांती, एकाग्रता आणि सकारात्मक ऊर्जा वाढविण्याचे महत्त्व यावेळी स्पष्ट करण्यात आले.
उद्योग-व्यवसायातील विविध अडचणी, ताणतणाव आणि दैनंदिन आव्हानांबाबत उद्योजकांनी विचारलेल्या प्रश्नांना गुरूश्री शंतनु जोशी यांनी समर्पक उत्तरे देत त्यांना मार्गदर्शन केले. प्रश्नोत्तरांच्या सत्राला उद्योजकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
‘उद्योग करताना केवळ यश मिळविणे नव्हे, तर तो आनंदाने आणि सकारात्मक मनाने करणेही तितकेच महत्त्वाचे आहे,’ हा संदेश या प्रशिक्षणातून उद्योजकांना मिळाला.
यावेळी सर्वश्री कमलाकांत कुलकर्णी, श्रीकांत दुधाणे,नितीन वाडीकर,कुशल सामाणी,हिंदूराव कामते,शामसुंदर तोतला, प्रदीपभाई कापडिया, गजानन कडूकर, संजीव तुंगतकर, प्रदीप तेंडूलकर,अजय सप्रे, आदित्य शाह, पियुष जाधव, सौ.सोनल पारखे, सौ.वृषाली पेंडसे, सौ.मनिषा वाडीकर, आरिफ शेख, अबुबकर शेख, तौफिक शेख,प्रसाद चौकले, सुहास नाईक,कुणाल भोसले इ.उपस्थित होते.