’’नवीन इमारत बांधकामासाठी विशेष सर्वसाधारण सभा घेण्याचा निर्णय’’
कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनची ७९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज अध्यक्ष ’’कमलाकांत कुलकर्णी’’ यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.
सभेच्या प्रारंभी अहवाल सालात निधन पावलेल्या असोसिएशनच्या सभासद, आप्तस्वकीय तसेच शहीद जवान आणि ज्ञात-अज्ञात व्यक्तींना उपस्थित सभासदांनी दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली अर्पण केली.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ’’कमलाकांत कुलकर्णी’’ म्हणाले, ’“कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनने ७९ वर्षांचा गौरवशाली प्रवास पूर्ण करून आता शतक महोत्सवाकडे आत्मविश्वासाने वाटचाल सुरू केली आहे. सभासदांच्या समस्या, औद्योगिक वसाहतीतील वीजदर, ईएसआयसी, जीएसटी, महावितरण, रस्ते, गटर्स व कचरा व्यवस्थापन यांसह विविध प्रश्नांवर संबंधित विभागांशी सातत्याने चर्चा करून असोसिएशनने सक्रिय भूमिका बजावली आहे.”’
नवीन लेबर कोड, बीआयएस कायदा तसेच सिडबीच्या विविध कर्ज योजनांबाबत उद्योजकांना मार्गदर्शन करण्यात आले असून, सिडबी प्रोमो सेंटरच्या माध्यमातून काही उद्योजकांना कर्जपुरवठाही उपलब्ध झाला आहे. तसेच उद्योजकांच्या ज्ञानवृद्धीसाठी पुस्तक प्रकाशनासारखे उपक्रमही राबविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
’’नवीन इमारत बांधकामाबाबत विशेष सभा’’
यानंतर सभेच्या नोटीस व अजेंड्यामध्ये नमूद केलेल्या विषयांवर चर्चा करण्यात आली. कार्यालयीन सेक्रेटरी प्रदीप व्हरांबळे यांनी अजेंड्यावरील विषयांचे वाचन केले व सर्व विषयांना सभासदांनी सर्वानुमते मंजुरी दिली.
संस्थेच्या नवीन इमारत बांधकामाबाबत प्राप्त झालेल्या विविध प्रस्तावांची माहिती उपाध्यक्ष श्रीकांत दुधाणे व खजिनदार प्रसन्न तेरदाळकर यांनी सभेस दिली. यावेळी अध्यक्ष कमलाकांत कुलकर्णी यांनी नवीन इमारतीबाबत सभासदांच्या सूचना व अभिप्राय मागविले. हा विषय महत्त्वपूर्ण असल्याने त्यावर सविस्तर चर्चा करण्यासाठी ’’केवळ नवीन इमारत बांधकाम या एकाच विषयावर विशेष सर्वसाधारण सभा घेण्याचा निर्णय’’ घेण्यात आला.
’’कचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी सर्वेक्षण पूर्ण’’
औद्योगिक वसाहतीतील कचरा व्यवस्थापनाच्या प्रश्नावरही सभेत चर्चा झाली. शिरोली एमआयडीसी, गोकुळ-शिरगाव एमआयडीसी, कागल एमआयडीसी आणि कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशन या चार संस्थांच्या संयुक्त सहभागातून कचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविण्याच्या दृष्टीने सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी ’’गोकुळ-शिरगाव येथे जागा उपलब्ध करून देण्यास एमआयडीसीने तयारी दर्शविली’’ असल्याची माहिती सभेत देण्यात आली.
बॅलेन्शीट इंग्रजीमध्ये छापणेः- अहवालात छापण्यात येणारी बॅलेन्शीट व इतर पत्रके इंग्रजीमध्ये छापण्याचा प्रस्ताव अध्यक्ष कमलाकांत कुलकर्णी यांनी मांडला यास सर्वांनी प्रतिसाद देत यास मंजूरी दिली.
’’असोसिएशनच्या कार्याचे कौतुक’’
सभासद अशोकराव जाधव यांनी कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या उत्कृष्ट कामकाजाबद्दल अभिनंदन केले. त्यांनी दिलेले लेखी अभिनंदनपत्र सभेत वाचून दाखविण्यात आले. त्याच बरोबर सभासद सुर्यकांत खोत यांनीही संचालक मंडळ असोसिएशनच्या स्टाफचे अभिनंदन केले.
दरम्यान, गोकुळ-शिरगाव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल संजय देशिंगे यांचे अध्यक्ष कमलाकांत कुलकर्णी व उपस्थित सभासदांनी टाळ्यांच्या कडकडाटात अभिनंदन केले.
यानंतर कोणतेही विषय नसल्याने अध्यक्ष कमलाकांत कुलकर्णी यांनी सभा संपल्याचे जाहीर केले आणि सभेचे आभार प्रदर्शन खजिनदार प्रसन्न तेरदाळकर यांनी केले.
यावेळी अध्यक्ष कमलाकांत कुलकर्णी, उपाध्यक्ष श्रीकांत दुधाणे, खजिनदार प्रसन्न तेरदाळकर, संजय अंगडी, बाबासाहेब कोंडेकर, अतुल आरवाडे, हर्षद दलाल, अमर करांडे, अभिषेक सावेकर, जयदीप मांगोरे, सुभाष चव्हाण, चंद्रकांत चोरगे, अशोकराव जाधव, रोहन अंगडी, मनोहर चव्हाण, सुधारक सुतार, विजय कामते, हिंदूराव कामते, किरण चरणे, संदीप मांगोरे, सागर जाधव, श्रीकांत सावेकर, प्रभाकर घाटगे, दिलीप निकम, सूर्यकांत खोत, मुनीर महात, बाळासाहेब चोपदार आदी सभासद उपस्थित होते.