‘उद्योग संवाद’ कार्यक्रमात कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष कमलाकांत कुलकर्णी यांची मागणी; विविध प्रश्नांचे निवेदन सादर

कोल्हापूर, दि. १४ ऑक्टोबर २०२६ : कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योजक, व्यापारी व व्यावसायिकांच्या समस्या शासनदरबारी मांडून त्यावर प्रभावी उपाययोजना करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रीकल्चर, मुंबई आणि कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘उद्योग संवाद कार्यक्रम’ मधुसुदन हॉल, हॉटेल पॅव्हेलियन, कोल्हापूर येथे संपन्न झाला. या कार्यक्रमात कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष कमलाकांत कुलकर्णी यांनी कोल्हापूरच्या औद्योगिक विकासाशी संबंधित महत्त्वाचे प्रश्न मांडून ते सोडविण्यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने पुढाकार घेण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमास महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष रवींद्र माणगावे, कार्यकारी सदस्य आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील विविध औद्योगिक संघटना व व्यापारी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

औद्योगिक विकासासाठी महत्त्वाच्या मागण्या

कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष कमलाकांत कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतात कोल्हापूरच्या औद्योगिक विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध मागण्या मांडल्या. यामध्ये प्रामुख्याने पुढील मुद्द्यांचा समावेश होता.

१. एफएसआयमध्ये वाढ : शिवाजी उद्यमनगर येथील औद्योगिक क्षेत्रात बांधकामासाठी एफएसआय (चटई क्षेत्र निर्देशांक) १.१० वरून २.२० पर्यंत वाढविणे.

२. भूमिगत विद्युत वाहिन्या : शिवाजी उद्यमनगर औद्योगिक क्षेत्रातील विद्युत वाहिन्या भूमिगत करण्याचे काम तातडीने सुरू करणे.

३. सौर ऊर्जा ग्राहकांच्या समस्या : रूफटॉप सोलर ग्राहकांवरील ग्रिड सपोर्ट चार्जेसचा प्रश्न सोडविणे आणि टीओडी (Time of Day) नियमांमध्ये आवश्यक शिथिलता देणे.

४. मोठ्या उद्योगाची उभारणी : कोल्हापूर जिल्ह्यात मोठा उद्योग आणण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करणे, जेणेकरून स्थानिक उद्योगांना पूरक संधी, रोजगार आणि व्यवसायवाढीस चालना मिळेल.

५. उद्योग सचिवांची बैठक : कोल्हापूरमधील औद्योगिक समस्यांवर चर्चा करण्यासाठी राज्याच्या उद्योग सचिवांची स्थानिक औद्योगिक संघटनांसोबत कोल्हापुरात विशेष बैठक आयोजित करणे.

या मागण्यांसंदर्भात कमलाकांत कुलकर्णी यांनी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष रवींद्र माणगावे यांना निवेदन सादर केले. कोल्हापूरच्या औद्योगिक क्षेत्राच्या दीर्घकालीन विकासासाठी या प्रश्नांचा प्राधान्याने पाठपुरावा करावा, असे आवाहन त्यांनी केले.

समस्यांचा पाठपुरावा करण्याचे महाराष्ट्र चेंबरचे आश्वासन

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष रवींद्र माणगावे यांनी आपल्या मनोगतात विविध औद्योगिक संघटनांनी सादर केलेल्या निवेदनांची दखल घेऊन संबंधित समस्यांचा पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन उद्योजक व व्यापारी प्रतिनिधींना दिले. उद्योग क्षेत्रातील अडचणी सोडविण्यासाठी औद्योगिक संघटना आणि महाराष्ट्र चेंबर यांच्यात समन्वय ठेवून कार्यवाही करण्याची भूमिका त्यांनी मांडली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष कमलाकांत कुलकर्णी यांनी सर्व औद्योगिक संघटनांच्या वतीने महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष रवींद्र माणगावे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

औद्योगिक संघटनांचा उत्स्फूर्त सहभाग

या कार्यक्रमास कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष कमलाकांत कुलकर्णी, उपाध्यक्ष श्रीकांत दुधाणे, खजिनदार प्रसन्न तेरदाळकर, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, स्मॅकचे उपाध्यक्ष भरत जाधव, कागल मॅकचे अध्यक्ष मोहन कुशिरे, गोशिमाचे उपाध्यक्ष संजय देशिंगे, आयटी असोसिएशनचे संचालक शांताराम सुर्वे, सीआयआयचे अध्यक्ष वीरेंद्र पाटील, माजी आमदार श्रीमती जयश्री जाधव, चेंबरचे उपाध्यक्ष राजू पाटील, संचालक आनंद माने, अजित कोठारी यांच्यासह महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स व कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे पदाधिकारी आणि विविध औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

कोल्हापूरच्या औद्योगिक विकासातील अडथळे दूर करून उद्योगांना पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी शासन, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स आणि स्थानिक औद्योगिक संघटना यांच्यातील समन्वय अधिक मजबूत होणे आवश्यक आहे. ‘उद्योग संवाद’ कार्यक्रमातून मांडलेल्या मागण्यांवर ठोस कार्यवाही होऊन कोल्हापूरच्या उद्योग-व्यापार क्षेत्राला चालना मिळेल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.


Address

1243/46-47, E Ward, Madhawrao Karajgar Road, Shivaji Udyam Nagar, Kolhapur