Shivaji Udyam Nagar,
Kolhapur, Maharashtra
किफायतशीर वीजदरांच्या प्रस्तावावर असोसिएशनकडून तुलनात्मक बिलांची माहिती सादर करण्याची मागणी कोल्हापूर, दि. १८ ऑक्टोबर २०२६ : एनर्जी ॲडव्हायझरी सर्व्हिसेस प्रा. लि. (EASPL) या ऊर्जा, कार्बन व्यवस्थापन आणि शाश्वतता क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्थेचे बिझनेस डेव्हलपमेंट एक्झिक्युटिव्ह श्री. बर्लुंग गायरी यांनी कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन औद्योगिक ग्राहकांसाठी उपलब्ध असलेल्या वीज खरेदीच्या विविध पर्यायांची आणि ऊर्जा खर्च कमी करण्याच्या संधींची माहिती दिली. यावेळी त्यांनी संस्थेमार्फत नवीकरणीय ऊर्जेची खरेदी, ओपन ॲक्सेस, कॅप्टिव्ह व ग्रुप कॅप्टिव्ह वीजपुरवठा, वीज व्यापार, वीजदरांचे अनुकूलन तसेच ऊर्जा खरेदीसंदर्भातील नियामक व तांत्रिक सल्ला यांसारख्या सेवांची माहिती दिली. या माध्यमातून उद्योगांना किफायतशीर दरात वीज उपलब्ध करून देण्याच्या संभाव्य पर्यायांबाबतही चर्चा करण्यात आली. यावेळी कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी, उद्योगांना सध्याच्या तुलनेत कमी दराने वीज उपलब्ध होत असेल, तर त्याबाबत सविस्तर आणि वस्तुनिष्ठ माहिती सादर करण्याची अपेक्षा व्यक्त केली. विशेषतः, संबंधित संस्थेमार्फत वीज खरेदी करणाऱ्या उद्योजकांची वीजदर, वीजबिल आणि एकूण वीजखर्च यांची पूर्वीच्या व सध्याच्या बिलांशी तुलना करणारी प्रत्यक्ष माहिती उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली. केवळ किफायतशीर वीजदरांचा प्रस्ताव मांडण्यापेक्षा, प्रत्यक्ष उद्योगांना किती आर्थिक बचत झाली आहे, तसेच ओपन ॲक्सेस किंवा अन्य पर्यायांचा स्वीकार करताना कोणते अतिरिक्त शुल्क, तांत्रिक अटी व नियामक बंधने लागू होतात, याची स्पष्ट माहिती मिळणे आवश्यक असल्याचे पदाधिकाऱ्यांनी नमूद केले. याबाबत एखाद्या केस स्टडीची माहिती मिळाल्यास अधिक स्पष्टता येईल. ही तुलनात्मक माहिती प्राप्त झाल्यानंतरच प्रस्तावाचा अभ्यास करून पुढील निर्णय घेता येईल, अशी भूमिका असोसिएशनने मांडली. ऊर्जा खर्च हा उद्योगांच्या उत्पादन खर्चातील महत्त्वाचा घटक असल्याने, वीज खरेदीच्या पर्यायी व्यवस्थांचा अभ्यास करताना प्रत्यक्ष आर्थिक लाभ, पारदर्शकता आणि व्यवहार्यतेला प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. या बैठकीस कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष श्री. कमलाकांत कुलकर्णी, उपाध्यक्ष श्री. श्रीकांत दुधाणे, मानद सचिव श्री. नितीन वाडीकर, श्री. प्रशांत मोरे, श्री. प्रदीप व्हरांबळे आदी उपस्थित होते.
1243/46-47, E Ward, Madhawrao Karajgar Road, Shivaji Udyam Nagar, Kolhapur